मुंबई : कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्तेचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला. श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेच्या बाबत सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे २ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन समाजामध्ये वाद झाला. या वादाचे नंतर मारहाणीत रूपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तसेच मारहाणीत जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या एका इसमाचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई केल्याचे दिसून येत नाही. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हेगाराला अटकही केली. मात्र न्यायालयातून जामिनावर त्याची सुटका झाली. श्रीगोंदा शहरातील प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्यात येऊन कोणालाही सोडण्यात येणार नाही, असेही गृह राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.