जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्स, आरोग्य, नवोन्मेषावर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह-बिल गेट्स यांच्यात चर्चा

0

नवी दिल्ली : तंत्रज्ञानावर आधारित सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, सध्या भारत दौऱ्यावर असलेले मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि सामाजिक कार्यात अग्रणी असणारे बिल गेट्स यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतातील नवोन्मेष क्षेत्रातील प्रगतीमध्ये आणि जैवतंत्रज्ञान उत्‍पादन वाढीमध्ये खाजगी क्षेत्र आणि स्टार्टअप यांचा सहभाग वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा केली. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळांच्या झालेल्या या बैठकीत जनूकाधारित उपचार पध्‍दती,नवोन्मेषी लस,जैवतंत्रज्ञान उत्पादन आणि भारताच्या विकसित होत असलेल्या स्टार्टअप परिसंस्थेमधील प्रगती,या विषयांवर चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारतात जैव ई ३ – म्हणजेच अर्थव्‍यवस्था,रोजगार आणि पर्यावरणासाठी जैवतंत्रज्ञान यासारख्या धोरणांच्या पाठबळामुळे जैवतंत्रज्ञान नवोन्मेशात वाढ झाली आहे, यावर डॉ.जितेंद्र सिंह यांनी यावेळी भर दिला. भारतातील जैव-क्रांती घडवून आणण्यात खाजगी क्षेत्र आणि स्टार्टअप्सची वाढती भूमिका त्यांनी अधोरेखित केली.यामध्ये जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक मंडळ (बीआयआरएसी) यासारख्या यंत्रणा सहकार्याला प्रोत्साहन देत आहेत.

बिल गेट्स यांनी भारताने जैव तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. लस विकसित करण्‍याच्या कार्यात भारताचे नेतृत्व त्यांनी मान्य केले.यावेळी एचपीव्ही आणि कोविड-19 लस निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या भागीदारींचेही यावेळी कौतुक केले.त्यांनी क्षयरोग आणि मलेरियासारख्या आजारांवर मात करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला रस असल्याचे मनोगत व्यक्त केले.भारताच्या संशोधन परिसंस्थांना जागतिक आरोग्य प्रगतीसाठी प्रचंड संधी उपलब्ध असल्याचे बिल गेटस यावेळी म्हणाले.

या भेटीदरम्यान चर्चेचा एक प्रमुख विषय म्हणजे भारतातील जैवतंत्रज्ञान स्टार्टअप क्षेत्रामध्‍ये झालेली प्रचंड वाढ हा होता. या क्षेत्रामध्‍ये आता १०,००० हून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. डॉ. जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, यापैकी ७०% वैद्यकीय आणि आरोग्य जैवतंत्रज्ञानावर केंद्रित आहेत, तर उर्वरित कृषी,पर्यावरण आणि औद्योगिक जैवतंत्रज्ञान या क्षेत्राशी निगडित आहेत. अशा क्षेत्रामध्‍ये वेगाने व्यापारीकरण सक्षम करण्यासाठी वाढीव निधी आणि धोरणात्मक उपाययोजनांसह या नवोन्मेषी कल्पना प्रत्यक्षात आणण्‍यासाठी सरकार वचनबद्ध आहे,यावर त्यांनी भर दिला.

बिल गेट्स आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी जागतिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आर्थिक केंद्र असलेल्या ‘गिफ्ट सिटी’द्वारे भारतीय जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्समध्ये थेट गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेतला.‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असले तरी, नवीन आर्थिक संरचनांचा फायदा घेतल्यास,आशादायी भारतीय स्टार्टअप्समध्ये थेट गुंतवणूक करता येऊ शकते,असे गेट्स यांनी नमूद केले.

भारत आपल्या जैवतंत्रज्ञानाच्या वाढीला गती देत असताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी या क्षेत्राची भरभराट सुरू रहावी, यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी वाढविण्यावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचे पुन्हा एकदा नमूद केले.वाढता संशोधन आणि विकास निधी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे, भारत जैवतंत्रज्ञान नवोपक्रमाचे जागतिक केंद्र बनण्यास सज्ज आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech