ठाणे : महायुतीच्या जागावाटपात ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तिन्ही पोलीस आयुक्तालयांमधून स्वत: विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागविल्याने येथील राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना उधाण आले आहे. आपणास लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने त्यासाठी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे महत्त्वाचे असल्याचे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
सरनाईक यांनी पाठविलेले हे पत्र मार्च महिन्याच्या अखेरचे असून दरम्यानच्या काळात महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेत बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सेनेपुढील ठाण्याचा संभ्रम वाढविल्याची चर्चा होती. ठाणे लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळायला हवा आणि या मतदारसंघातून भाजप नेते गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांपैकी कुणालाही उमेदवारी देऊ नका, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी घेतली होती. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे.