संघाच्या प्रतिनिधीसभेत बांगलादेशवर चिंता

0

सहसरकार्यवाह अरुण कुमार यांची माहिती
बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेची बैठक सुरू आहे. यात बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती संघाचे सहसरकार्यवाह अरुणकुमार यांनी दिली. यासंदर्भातील निवेदनात अरुणकुमार म्हणाले की, बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचे कारण केवळ राजकीय नाही तर धार्मिक देखील आहे. आम्ही बांगलादेशातील हिंदू समुदायाला पाठिंबा देतो. बांगलादेशातील हिंसाचार सत्ता परिवर्तनामुळे नसून त्यामागे धार्मिक कारणे देखील आहेत. यातूनच अल्पसंख्याक आणि हिंदूंना सतत लक्ष्य केले जात आहे. धार्मिक अल्पसंख्याकांवरील हिंसाचार नवीन नाही. यापूर्वी १९५१ मध्ये बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या २२ टक्के होती. त्यात घट होऊन तेथे आता ७.९५ टक्के हिंदू शिल्लक आहेत. हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराला तेथील सरकारचाही पाठिंबा असल्याचे दिसून येते. बांगलादेशात भारतविरोधी भावना वाढत आहे. संघाने आपल्या प्रस्तावात आंतरराष्ट्रीय शक्तींबद्दलही चिंता व्यक्त केली आहे.

भारत आणि त्याचे शेजारी देश हे केवळ देशांचा समूह नाहीत तर त्यांचा इतिहास सामायिक आहे. आपल्यात बरेच साम्य आहे. अनेक जागतिक शक्ती भारत आणि त्याच्या शेजारील देशांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अरुणकुमार म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसांची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा शुक्रवारपासून बेंगळुरूमध्ये सुरू आहे. या बैठकीत बांगलादेश हिंसाचार तसेच मणिपूर, भाषा वाद आणि संघाच्या शताब्दी समारंभांबाबत ठराव मंजूर केले जातील. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबद्दल विचारले असता अरुण कुमार म्हणाले की, संघाच्या अंतर्गत ३२ हून अधिक संघटना काम करतात. प्रत्येक संस्था स्वतः स्वतंत्र असते आणि तिची निर्णय घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र असते. प्रत्येक संस्थेचे स्वतःचे सदस्य असतात, निवडणुका असतात आणि त्यांची संपूर्ण प्रक्रिया वेगळी असते. भाजप आणि संघ यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही देश आणि समाजासाठी एकत्र काम करतो. संघटनेची प्रक्रिया सुरू आहे आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. भविष्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुका होतील असे त्यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech