मुंबईसह उपनगरातील प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याबाबत ॲक्शन प्लॅन तयार करणार – रेल्वे मंत्री

0

नवी दिल्ली : मुंबई, ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले. श्री. वैष्णव यांनी प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मकता दाखवत अॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याचे आश्वासन दिले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले.

महिलांसाठी विशेष लोकल सेवा, स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृहे, सर्व स्थानकांवर स्वच्छ आणि दर्जेदार महिला शौचालयांची व्यवस्था करावी, प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावे. रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत. ठाणे आणि मुलुंड च्या स्टेशनच्या दरम्यान एक नवीन स्टेशनच्या कामाला गती द्यावी. स्टेशनवरची वन रुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत ती लवकरात लवकर सुरू करावीत. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी अशा विविध मागण्या खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech