नागपूर : अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी व मेहुणीचा नागपुरात अपघात झाला. नागपुरातील मेट्रो उड्डाणपुलावर सोमवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती आहे. वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर एका ट्रकशी कार धडकली. यात कारचा चेंदामेंदा झाला असून सूद यांच्या पत्नी सोनालीसोबतच तिची बहिण सुमिता साळवे (वय ५५) आणि पुतण्यादेखील जखमी झाले आहेत. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली सूद, तिची बहिण आणि पुतण्या हे बाहेरगावाहून सोमवारी(दि. २४) रात्री नागपुरला येत होते. उड्डाणपुलावर एका ट्रकला गाडी मागून धडकली व त्यामुळे मोठा अपघात झाला. कारचे बोनेट पुर्णत: चेंदामेंदा झाले. सोनाली समोरील सीटवर बसल्या होत्या व त्या जखमी झाल्या. कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तातडीने एका इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सोनाली सूद ही लाईमलाईटपासून दूर राहते. सोनू सूदने १९९६ मध्ये सोनालीशी लग्न केलं होतं. ती एक मूळची आंध्र प्रदेशची आहे. या जोडप्याला अयान आणि इशांत अशी दोन मुले आहेत. सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीए केले आहे. ती व्यवसायाने एक प्रसिद्ध चित्रपट निर्मातीही आहे.