अहमदाबाद : आयपीएल २०२५ स्पर्धेतील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना होता. यामध्ये पंजाबने गुजरातचा परभव करत बाजी मारली. दरम्यान, या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरातकडून राशिद खानने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.राशिद खानने आपल्या आयपीएल कारकिर्दीतत १५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
राशिद खानने हा सामना खेळण्यापूर्वी १२१ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने २१.८२ च्या सरासरीने १४९ गडी बाद केले होते. यादरम्यान ४ गडी बाद २४ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आतापर्यंत त्याने २ वेळेस ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. या डावात गोलंदाजीला येताच राशीदने विस्फोटक फलंदाज प्रियांश आर्यला बाद केलं. प्रियांश राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद होणारा १५० वा फलंदाज ठरला. यासह या सामन्यात १५० विकेट्स पूर्ण करताच त्याने हरभजन सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. हरभजन सिंगनेही आपल्या आयपीएल कारकिर्दीत १५० विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
राशिद खान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. राशिद खानच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४६२ टी-२० सामन्यांमध्ये ६३४ विकेट्स घेतल्या आहेत. हा कारनामा त्याने १० वर्षात केला आहे. राशिद खान अवघ्या २६ वर्षांचा आहे. तो आणखी काही वर्ष टी-२० क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे त्याच्याकडे १००० विकेट्स घेण्याची संधी असणार आहे. येणाऱ्या काही वर्षात त्याने अशीच कामगिरी सुरु ठेवली, तर तो लवकरच १००० विकेट्स घेण्याचा कारनामा करु शकतो.