मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १२ महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आले असून, दरदिवशी सरासरी ९ तास कामकाज चालले. राज्यासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. सरकारने चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विरोधी पक्षालाही त्यांच्या मुद्द्यांसाठी संपूर्ण संधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या अधिवेशनात महत्वाच्या विधेयकांमध्ये माथाडी कामगार कायद्यातील सुधारणा विधेयकाचा समावेश असून या विधेयकामुळे बनावट माथाडी आणि ब्लॅकमेलिंग रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक आणि विनियोजन विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके संमत करण्यात आली. या अधिवेशनात संविधानावर विशेष चर्चा झाली, तसेच अर्थमंत्री यांनी शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर आधारित अर्थसंकल्प सादर केला आहे,जो महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल. मुख्यमंत्री यांनी अधिवेशनाच्या यशस्वीतेबद्दल सर्व आमदार, मंत्री, पिठासीन अधिकारी, विधानमंडळ कर्मचारी आणि माध्यमांचे आभार मानले.