रणदीप हुड्डाला चित्रपटात १८५७ पासून सगळंच हवं होतं

0

मुंबई : वीर सावरकर चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. रणदीप हुड्डाने या सिनेमात वीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. तसंच या सिनेमाच्या संवादलेखनाचं आणि दिग्दर्शनाचंही काम त्याने केलं आहे. हा सिनेमा साधारण दोन वर्षांपूर्वी जाहीर झाला होता. त्यावेळी हा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. मात्र त्यांनी हा सिनेमा सोडला. वीर सावरकर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा का सोडला? याची विविधं कारण माध्यमांनी चालवली. मात्र हा सिनेमा महेश मांजरेकर यांनी का सोडला? त्यामागे काय कारण होतं हे त्यांनी लोकसत्ता अड्डामध्ये सांगितलं आहे.

अभिनेता रणदीप हुड्डाने या सिनेमाचं शेड्युल लांबलं, त्यानंतर हा सिनेमा घर, मालमत्ता गहाण ठेवून करावा लागला हे मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र महेश मांजरेकरांनी हा सिनेमा का सोडला त्याचं कारण सांगणं हे रणदीप हुड्डाने टाळलं आहे. त्यावेळी झालेल्या वादांबाबत, जे झालं ते झालं आता सिनेमाही बनला आहे, त्यामुळे जुन्या गोष्टींबाबत बोलायचं नसल्याची प्रतिक्रिया रणदीपनं अनेक मुलाखतींमधून दिली होती.

” मी ‘वीर सावरकर’ हा चित्रपट सोडला वगैरे वगैरे चर्चा माझ्याबद्दल खूप झाली. सिनेमा प्रदर्शित झाला आहे, आता मी त्यावर बोलतो. वीर सावरकरांचे विचार वगैरे पटत नाहीत अशी टीका झाली. मी काहीच बोललो नाही कारण लोकांना तेच हवं होतं. त्यामुळे मी ही सगळी चर्चा होऊ दिली. ‘वीर सावरकर’ यांच्याबद्दल मला प्रचंड आकर्षण आहे. खरं सांगायचं तर ज्यांनी सिनेमा केला आहे, त्यांना काही घेणंदेणंही नव्हतं. कायम वाटायचं की वीर सावरकरांवर चित्रपट करायचा. संदीप सिंग निर्माता होता तो आला, सिनेमा करायचं ठरलं. रणदीप हुड्डाला घ्यायचं ठरलं. त्याला (रणदीप हुड्डाला) सावरकर काळे की गोरे माहीत नाहीत. मात्र त्याचं श्रेय हे आहे की त्याने सगळा इतिहास वाचून काढला. आधी त्याला वाटलं होतं की वीर सावरकर व्हिलन आहेत. मी त्याला सांगितलं की तू सगळं वाच. चित्रपटातलं ७० टक्के स्क्रिप्ट माझं आहे. पहिल्या वाचनाला त्याने सांगितलं हे हवं आहे, ते हवं आहे. रणदीप हुड्डा हस्तक्षेप करु लागला. स्क्रिप्ट लॉक होईना, शूट थांबलं होतं. बजेट वाढू लागलं होतं. मला तर वाटलं की मी मरेन. कारण चित्रपट वाईट झाला तर लोक मला नावं ठेवतील. वीर सावरकरांवर सिनेमा करायचा आहे तर तो उत्तमच झाला पाहिजे या मताचा मी होतो.”

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “त्यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली ती इतकी नकारात्मक होती की मी शेवटी निर्मात्याला सांगितलं की एक तर रणदीप हुड्डाला सिनेमा करु दे किंवा मी तो सिनेमा करतो. तो रोज एखादी नवीन कल्पना घेऊन यायचा. त्याला त्या सिनेमात भगत सिंग, हिटलर सगळी पात्रं हवी होती. मी रणदीपला म्हटलं की तू वीर सावरकरांवर सिनेमा करतो आहेस. त्यामुळे वीर सावरकरांवर फोकस ठेवायला हवा. नंतर नंतर तो लेखनाच्या व दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करायला लागला. अमुक सीन असा करायचा आहे, वगैरे तो सांगू लागला. एक दिवस त्याने माझ्या हातात स्क्रिप्ट ठेवलं आणि म्हणाला की ही सव्वा दोन तासांची स्क्रिप्ट आहे. मी म्हटलं माझ्याकडे साडेचार तासांची स्क्रिप्ट आहे. तो सिनेमासाठी ऑब्सेस्ड झाला होता. रणदीपला भेटायला जावं तर तो वीर सावरकरांच्या वेशात बसलेला असायचा, मी त्याच्यातल्या अभिनेत्याशी संवाद कधी साधायचा? मग मला वाटू लागलं की तो (रणदीप हुड्डा) जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत होता. मग निर्मात्याला सांगितलं की तू त्याला निवड किंवा मला निवड कारण मला हवाय तसा चित्रपट याच्याबरोबर (रणदीप हुड्डा) होऊ शकत नाही.”

यानंतर महेश मांजरेकर म्हणाले, “मला त्याच्याबरोबर सिनेमा करता येणार नाही हे मी निर्मात्याला सांगितलं. रणदीप हुड्डा पुन्हा माझ्याशी बोलायला आला. मी त्यानंतर त्याला सांगितलं की तू ‘गांधी’ सिनेमा पाहा त्यात त्यांनी नथुराम गोडसेही फक्त शेवटच्या सीनमध्ये दाखवला आहे. एकदा त्याचा मला फोन आला मला म्हणाला, लोकमान्य टिळकांचं स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्यही मला त्यात हवं आहे. मी त्याला शेवटी म्हणालो की आपण वीर सावरकरांवर चित्रपट करतो आहे हे विसरु नकोस.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech