तिरुवनंतपुरम : विश्वविजेता लिओनेल मेस्सी आणि त्याचा अर्जेंटिना संघ १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी हा संघ केरळ येथे प्रदर्शनीय सामना खेळणार आहे.मेस्सीच्या या भारत दौऱ्याची निश्चिती आज बुधवारी(दि. २७) झाली.केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी मेस्सी त्याच्या अर्जेंटिनासह कोचीमध्ये सामना खेळणार असल्याची घोषणा गेल्या नोव्हेंबर महिन्यात केली होती.
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन आणि एचएसबीसी यांनी भारत आणि सिंगापूरमधील फुटबॉलसाठी एका वर्षाचा करार केला आहे. मेस्सी याअगोदर विश्वकरंडक पात्रता सामना खेळण्यास भारतात आला होता. व्हेनेझुएला यांच्याविरुद्धचा हा सामना सप्टेंबर २०११ मध्ये कोलकाता येथे झाला होता. त्या सामन्यात अर्जेंटिनाने १-० असा विजय मिळवला होता. एचएसबीसी हे या सामन्याचे प्रायोजक असून देशात फुटबॉलला अधिक चालना मिळण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
अर्जेंटिनाचा संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ते गतविजेतेही आहेत, त्यामुळे फुटबॉल विश्वातील बलाढ्य संघाचा खेळ पाहण्याची संधी भारतीयांना मिळेल.अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या जागतिक प्रसार धोरणातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतासह सिंगापूरमध्ये खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत, असे अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडिओ फॅबियन म्हणाले.