मुंबई : ‘आहट’ या प्रसिद्ध हॉरर मालिकेशी परिचय करून देणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी आता ‘आमी डाकिनी’ या नवीन हॉरर शो सह या प्रकाराची नवीन व्याख्या करण्यास सज्ज आहे. कोलकाताच्या सुंदर आणि झपाटलेल्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या नवीन मालिकेच्या वेधक कथानकात रहस्य, नाट्य आणि भुताटकीचे घटक असतील. या थरारक कथानकाच्या केंद्रस्थानी अयान रॉय चौधरी आणि मीरा घोष या दोन व्यक्तिरेखा आहेत, ज्या अनुक्रमे हितेश भारद्वाज आणि राची शर्मा यांनी साकारल्या आहेत. अयानचा भूतप्रेतावर विश्वास नसतो पण त्याच्या जीवनावरच एका सूडाने पेटलेल्या आत्म्याचे सावट येते. मीरा एक भाबडी पण निडर मुलगी आहे, जिला कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे असे वाटते.
या मालिकेत आपण भूमिका करत असल्याची पुष्टी करताना हितेश भारद्वाज उत्साहाने सांगतो, “अयान ही व्यक्तिरेखा मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी आहे. कथेतील भय तत्त्व आणि भावनांची खोली यामुळे प्रेक्षकांना ही व्यक्तिरेखा वेधक वाटेल. अयान आणि मीरा यांच्या नातेसंबंधांची सुरुवात अनपेक्षितपणे होते. कथा पुढे सरकताना त्यांच्या नात्याची कसोटी अगदी वेगळ्याच, अनपेक्षित घटनांमधून होते. ही भूमिका तीव्र भावनांचा आणि समाधानाचा अनुभव देणारी आहे. प्रेक्षकांपर्यंत ही मालिका कधी पोहोचते असे मला झाले आहे!”
आपल्या भूमिकेबद्दल सांगताना राची शर्मा म्हणते, “मीराच्या निरागसतेमुळे या हॉरर मालिकेत तिची व्यक्तिरेखा एकदम टवटवीत वाटते. ती काही संकटात सापडलेली स्त्री नाही. ती आव्हानांचा हिंमतीने सामना करणारी मुलगी आहे. मीरा आणि अयान यांची व्यक्तिमत्त्वे अगदी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप अनपेक्षित क्षण उभे राहतात. ही व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना मला मजा येत आहे. ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी मला अपेक्षा आहे.” भयावह सेटिंग, उत्तम परफॉर्मन्स आणि प्रेम व सूडाची झपाटणारी कथा यांच्यासह ‘आमी डाकिनी’ प्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढवत ठेवेल. बघा, ‘आमी डाकिनी’चा प्रीमियर फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!