दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘कर्ज वरातू’ (घरी परत या) या नक्षल निर्मूलन मोहिमेअंतर्गत, विविध भागात सक्रिय असलेल्या २६ नक्षलवाद्यांनी आज, सोमवारी दंतेवाडा डीआरजी कार्यालयात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पित नक्षल्यांना पुनर्वसन धोरणांतर्गत आवश्यक मदत आणि सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक गौरव रॉय यांनी सांगितले. छत्तीसगड सरकारच्या नव्याने तयार केलेल्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. याशिवाय, त्यांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, शेती जमीन आणि इतर सुविधा देखील पुरविल्या जातील.
आत्मसमर्पण करणाऱ्यांपैकी ३ नक्षलवाद्यांवर एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जिल्हा पोलिस दल आणि सीआरपीएफकडून सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा सतत संपर्क, संवाद आणि व्यापक प्रचार करून नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत एकूण ९५३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे पोलिस अधीक्षक रॉय यांनी सांगितले.