मुंबई : २०२८ साली लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आता क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. मुंबईत पार पडलेल्या १४१व्या IOC च्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, या ऐतिहासिक क्षणात रोहित शर्मा व विराट कोहली यांना सहभाग घेता येणार नाही. ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्ष दूर राहिलेला क्रिकेटचा समावेश क्रीडा विश्वात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा पार पडणार असून पुरुष व महिला अशा प्रत्येकी ६ संघांनाच समावेश केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल सहा संघांना ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि त्यामुळे ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ शकणार नाहीत. २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ३५१ पदकांच्या स्पर्धांसाठी जगभरातील खेळाडू शर्थीचे प्रयत्न करताना दिसणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या तुलनेत ( ३२९) तीन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत २२ नव्या खेळांचा समावेश केला गेला आहे.
या २०२८च्या ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण प्रकाराची सर्वाधिक ५५ स्पर्धा होणार आहेत. त्यानंतर मैदानी ( ४८), सायकलिंग ( २२), जिमनॅस्टीक्स ( १९), ज्यूदो व रोईंग ( प्रत्येकी १५) यांच्या जास्त स्पर्धा होतील. याशिवाय तिरंदाजी, बॅडमिंनट, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनोए, घोडेस्वारी, फेन्सिंग, फुटबॉल, गोल्फ, हँडबॉल, हॉकी, मॉडर्न पँटथलॉन, रग्बी, सैलिंग, नेमबाजी हेही क्रीडा प्रकार आहेत. स्केटबोर्डिंग, सर्फिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, क्रिकेट, फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल, लाक्रॉस, स्क्वॉश असे खेळही असणार आहेत.