मुंबई – संयुक्त राष्ट्रे- जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन नसून आपला भारत देश आहे. गेल्यावर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ज्ञांनी भारत हा सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल असा अंदाज वर्तवला होता.त्यानुसार आता खरोखरच भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे.भारताची सध्याची लोकसंख्या १४४.७ कोटी आहे. ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए)च्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आली आहे.
यूएनएफपीएच्या ‘जागतिक लोकसंख्या २०२४’ च्या अहवालानुसार १४४.१७ कोटी लोकसंख्येसह भारत जगात अव्वल आहे, तर १४२.५ कोटी लोकसंख्येसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात वर्ष २०११ साली केलेल्या जनगणनेवेळी १२१ कोटी लोकसंख्या नोंदवण्यात आली होतीभारतात वर्ष २००६ ते २०२३ दरम्यान २३ टक्के बालविवाह झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.गर्भवती माता मृत्यूदरात देखील लक्षणीय घट झाली आहे.
नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार देशातील ६४० जिल्ह्यांमध्ये जवळपास एकतृतीयांश जिल्ह्यांनी माता मृत्यू दर कमी करण्याचे लक्ष्य गाठले आहे.भारताच्या लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वयोगटातील, १७ टक्के १० ते १९ वयोगटातील आहे. १० ते २४ वयोगटात २६ टक्के तर १५ ते ६४ वयोगटात ६८ टक्के लोकसंख्या असून सात टक्के लोकसंख्या ही ६५ वर्षांवरील आहे. भारतातील पुरुषांचे आयुर्मान ७१ वर्षे तर महिलांचे आयुर्मान ७४ वर्षे आहे.