तूर्तास अमरावती विमानतळ हेच नाव राहणार-‘एमएडीसी’

0

अमरावती : ‘अलायन्स एअर’ने निमंत्रणाच्या पत्रात अमरावती विमानतळाचा उल्लेख डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा केल्याने निर्माण झालेल्या गोंधळावर अखेर ‘अलायन्स एअर’नेच खुलासा केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी पाठवलेल्या पत्रात चूक सुधारली आहे.अमरावती-मुंबई प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ बुधवारी १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेच्या शुभारंभाच्या संदर्भात १० एप्रिल रोजी निमंत्रण पत्र तयार करण्यात आले होते. त्यात अमरावती विमानतळाचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख विमानतळ असे लिहिले आहे. मात्र विमानतळाचे अचूक नाव अमरावती विमानतळ आहे. डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ हे नाव ‘गुगल सर्च’ वरून घेतले आहे पण अधिकृत पत्रव्यवहारात अमरावती विमानतळ असे नाव नमूद करण्यात आले आहे. सुधारित निमंत्रण पत्र तुम्हाला लवकरच पाठवले जाईल. १० एप्रिल २०२५ रोजीचे पूर्वीचे पत्र मागे घेण्यात आले आहे, असे ‘अलायन्स एअर’चे चेअरमन अमित कुमार यांनी म्हटले आहे.

‘अलायन्स एअर’ने काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांना १० एप्रिलला निमंत्रण पत्रिका पाठवली, त्यात विमानसेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी १६ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळावर उपस्थित रहावे, असा उल्लेख होता. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने मात्र ‘अलायन्स एअर’ची ही चूक असल्याचे कालच स्पष्ट केले होते. अद्याप शासन स्तरावर विमानतळाला नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात अलायन्स एअरला कळविण्यात आल्याचे ‘एमएडीसी’चे म्हणणे होते. ‘एमएडीसी’च्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी देखील शनिवारी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना अमरावती विमानतळाच्या नामकरणासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले होते.

खासदार बळवंत वानखडे यांनी गेल्या ३ एप्रिलला लोकसभेत भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली, शिवाय बेलोरा विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला होता. त्यानंतर बळवंत वानखडे यांना मिळालेल्या निमंत्रण पत्रिकेत डॉ. पंजाबराव देशमुख यांचा नामोल्लेख असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech