ठाणे : कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरमत समागम कार्यक्रम, एनएमएमसी मैदान, गुरुद्वाराजवळ, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा ताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरुमत समागम कार्यक्रमात गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहता आले, हे माझे सौभाग्य आहे. आपण सर्वजण गुरुजींचा आशीर्वाद घेतो.
गुरु ग्रंथ साहेब यांच्या माध्यमातून जे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात ते केवळ शीख समुदायाच्या कल्याणासाठी नसून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गुरुनानक देव साहेब यांनी जे विचार संपूर्ण देशांमध्ये पोहोचविले. त्यामुळे एक मोठा नानकपंथी समाज उभा राहिला, त्यामध्ये शीख समाजाबरोबर सिंधी लमानी बंजारा शिकलगार समाजही आहे. गुरुनानक देव साहेब यांनी जे विचार आपल्यासमोर ठेवले त्या विचारांवर चालण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे. ते म्हणाले, दहा गुरूंची परंपरा खूप महान आहे. आपल्या गुरूंनी नुसते विचार दिले नसून लढण्याची हिंमत व ताकद पण आपल्याला दिली आहे. गुरु तेग बहादूर सिंग यांच्या शहादतचा 350 वे पर्व सुरू आहे. त्यांना आजही “हिंद की चादर” असे संबोधले जाते. त्यांनी काश्मिरी पंडितांची जुलुमातून सुटका करण्यासाठी लढा दिला. गुरुगोविंद सिंग यांनी हा वारसा पुढे चालविला.
फडणवीस म्हणाले की, गुरु पुरव पर्वात महाराष्ट्र सरकार सामील होईल. शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरूंची गाथा जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंजाब साहित्य अकॅडमीची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. अकरा लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून संवाद साधला जातो. समाजासाठी आवश्यक बाबींची माहिती या कमिटीच्या मार्फत शासनास कळविली जाते. निर्वासित लोक, प्रार्थना स्थळे यांना जागा देण्यात येणार आहे. मदरसे यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून मदत करण्यात येणार आहे.