नवी दिल्ली : वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात पश्चिम बंगालमध्ये सुनियोजित हिंसाचार झाला. या हिंसाचाराची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
वकील शशांक शेखर झा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेच्या अपयशाबद्दल पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागावे, असे याचिकेत म्हटले आहे. हिंसाचारातील पीडितांना थेट भरपाई द्यावी अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, मुर्शिदाबादमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायदा, 2025 विरुद्ध झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य केले जात असून ही गंभीर बाब आहे, असे याचिकेत म्हटले आहे. हा हिंसाचार एक नियोजित कट आहे. पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारच्या लक्ष्यित सांप्रदायिक आणि राजकीय हिंसाचाराची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशीच परिस्थिती उद्भवली होती, असे याचिकेत नमूद केले आहे.