हीरक महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवणार – लोढा

0

मुंबई : समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे, खऱ्या अर्थाने अंत्योदयांच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती होईल, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांच्या विचारांवर आधारित पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राज्यभरात राबवण्यात येणार आहे. ‘आदर्श गाव’ ही संकल्पना या महोत्सवात राबवण्यात येणार आहे शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा असे कौशल्य विकास,उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निर्देश दिले.

राज्यात २२ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे याबाबत मंत्रालयात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर सचिव मनीषा वर्मा, दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, दीनदयाळ संशोधन संस्थेचे सचिव अतुल जैन उपस्थित होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या महोत्सावासाठी शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानवदर्शन महोत्सव समिती स्थापन केली असून या समितीचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा अध्यक्ष आहेत. मानव कल्याण यासंदर्भातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे मौलिक विचार समाजात रुजावेत या उद्देशाने देशभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव साजरा होणार आहे. देशभरात या महोत्सवाला सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीत दिली.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे कार्य, विचार प्रणाली, एकात्म मानवदर्शन आदि बाबतची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पंडितजींच्या विचारांवर आधारित एक लाख पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवात ग्रामीण भागात बचतगट, अंगणवाड्या आणि शाळांमध्ये कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. तसेच गावातील स्वच्छता विषयक उपक्रम, घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत योजना तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजना पोहचवण्यासाठी या महोत्सवात युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महोत्सवात महिला व बाल विकास, शालेय शिक्षण, ग्रामविकास, सांस्कृतिक कार्य, आदिवासी विकास, पर्यावरण, पर्यटन या विभागाकडूनही या महोत्सवात विविध कार्यक्रमाद्वारे योगदान दिले जाणार आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जिल्हास्तरावर समिती स्थापन करून हा महोत्सव जिल्हाधिकारी यांनी यशस्वी करावा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech