(अनंत नलावडे)
मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला निवडणूक लढविण्यास सांगितले होते. मात्र नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने महायुतीत या जागेचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे नाशिक मतदारसंघातून मी माघार घेत आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी येथे पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
भुजबळ म्हणाले, नाशिकच्या जागेसोबत अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली.अमित शाह यांनी नाशिकची जागा लढवण्याचे मला सांगितले होते. त्यावेळी ही जागा शिवसेनेकडे असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. त्यानंतरही अमित शाह म्हणाले की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत बोलू. त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो.तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा निरोप आहे, तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल असे त्यांनी सांगितले.त्यानंतर मी निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.
मराठा समाज,आदिवासी,ओबीसी,अल्पसंख्याक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला.आता महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांच्याकडून प्रचाराचा एक टप्पा पूर्ण झाला आहे.परंतु महाविकास आघाडीच्या चर्चेतून नाशिकचा प्रश्न सुटला नाही.यामुळे मी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत असल्याचे सांगत,आता महायुतीने या ठिकाणी तातडीने निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणीही भुजबळ केली.
…………