श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी – प्रा.राम शिंदे

0

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पुढील महिन्यात दिनांक ३१ मे, २०२५ रोजी येत आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणाऱ्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

विधान भवन येथे सभापती श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधितांना निर्दैशित केले. यावेळी मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांची विशेष उपस्थिती होती. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तर दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व संबंधित विभागांची चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण करणे, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक करण्याच्या दृष्टीने या आराखडयास प्राधान्य द्यावे. चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोद्वार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात याव्या, याबाबतचा प्रस्ताव तत्परतेने सादर करण्याबाबत सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी सूचित केले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech