आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टीक्सपटूंचा खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते सत्कार  

0

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त  पूजा सुर्वे यांचाही विशेष सत्कार

ठाणे – ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टीक्सपटूंचा सत्कार सोहळा ठाण्यातील बाबुराव सरनाईक जिम्नॅस्टीक्स सेंटर येथे आयोजित केला होता. आंतरराष्ट्रीय आणि `खेलो इंडिया’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या ठाण्याच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा सत्कार प्रमुख पाहूणे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.
रिदमिक जिम्नॅस्टिक्स – संयुक्ता काळे, अस्मी बडदे, किमया कार्ले, आर्या कदम, साईज्ञा शिंदे, स्वरांगी नार्वेकर आणि अनन्या कोठारे कलमकारा. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स – आर्यन दवंडे व सारा राऊळ, अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स – ओवी प्रभू, चिन्मई दुसाने, अॅरोबिक जिम्नॅस्टिक्स मध्ये नॅन्सी बरोलीया या सत्कारमूर्तींचा समावेश होता.

कार्यक्रमाला असोसिएशन अध्यक्ष श्रीमती सुलेखा चव्हाण, कार्याध्यक्ष राजेश मोरे, सचिव बाळू ढवळे, आर्य क्रीडा मंडळाचे सचिव पाटणकर सर, जॉईन्ट सेक्रेटरी वैद्य सर, सदस्य पोवळे, स्मिता सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि ठाण्यातील अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी तयार करणाऱ्या, त्यांच्या मागे मेहनत घेणाऱ्या  शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त पूजा सुर्वे यांचासुद्धा विशेष सत्कार खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.

रिदमिक जिम्नॅस्टिकचे सर्व ७ खेळाडू पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सचे खेळाडू महेंद्र बाभूळकर आणि अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्सचे खेळाडू हेमंत दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.एखाद्या शहराची श्रीमंती ही केवळ उंच इमारतींवरून ठरत नाही, तर त्या शहरात असलेल्या खेळाडूंनी, त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलेल्या यशामुळे ठरत असते. हे खेळाडू ठाण्याची शान आहेत, ठाण्याचं खरं वैभव आहे. खेळाडूंमुळे ठाण्याची श्रीमंती आणि उंची वाढत आहे, असं मनोगत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त करत सर्व खेळाडूंचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जिम्नॅस्टिक खेळाच्या वृद्धीकरता आणि विकासाकरता आज हे स्टेडियम उभे राहिलेले आहे त्यामागे खासदार नरेश म्हस्के यांचे योगदान आहे. ते नेहमी जिम्नॅस्टिक खेळाला प्रोत्साहन देतात आणि या खेळाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पूजा सुर्वे यांनी खासदार नरेश म्हस्के यांचे विशेष आभार मानले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech