मालेगाव : बांगलादेशी, रोहिंगे व इतर बनावट जन्म दाखले प्रकरणातील मालेगाव महानगरपालिकेतील डाटा एन्ट्री कॉम्प्युटर ऑपरेटर गजाला परवीन उर्फ कजाला मुश्ताक इकबाल मदत सर अहमद यांच्या जामीन अर्जाची सुनावणी नुकतीच संपली. मालेगावच्या सत्र व भ्रष्टाचार प्रतिबंधक विशेष न्यायालयात सलग दोन दिवस सुनावणी चालली. यावेळी आरोपींतर्फे युक्तिवाद करताना गजाला परवीन यांच्याविरुध्द कोणताही पुरावा नसल्याचा दावा करण्यात आला. तसेच निव्वळ राजकीय हेतुने ही केस दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी युक्तिवाद करताना आज पर्यंत नोदविलेल्या साक्षीदारांच्या जबाबाची प्रत सादर करत गजाला परवीन यांनी बोगस व खोटे अनुपलब्धता प्रमाणपत्र कोणतेही अधिकार नसताना अनेक बांगलादेशी घुसखोरांना दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. त्याचबरोबर २०२० मध्ये मालेगावात सापडलेल्या बांगलादेशी घुसखोरांना पारपत्रे मिळविण्यासाठी मालेगाव महापालिकेने दिलेले अनुपलब्धता प्रमाणपत्राचा पुरावा देत जन्मदाखला मिळवला होता. या जन्मदाखल्याचा आधार घेत या घुसखोरांनी पारपत्रे मिळविल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात गजाला परवीन यांचे पती बांगलादेशी घुसखोरांसह सह आरोपी असल्याचेही न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. त्याचबरोबर महापालिकेच्या कार्यालयात गजाला परवीन यांच्याकडे त्यांचे पती सातत्याने चकरा मारत असल्याचा जबाब साक्षीदारांनी दिल्याचे सांगितले. तसेच गजाला परवीन यांच्या बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचेही अॅड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर गजाला परवीन दुसऱ्याचे बाळ न्यायालयात आणून ते स्वतःचे भासवत न्यायालयाची दिशाभूल केली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जामिन अर्जांचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला.