बाळासाहेबांना धमक्या देऊन पक्ष संघटना काबीज केली; खा.म्हस्के यांची उबाठावर टीका

0

नवी दिल्ली : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी राज ठाकरे, गणेश नाईक, नारायण राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा उबाठाने घर सोडून जाऊ, अशा धमक्या दिल्या आणि पक्ष संघटना काबीज केली, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आज केली. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर त्यांना पोटदुखी झालीय, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे कायम संपर्कात असतात, असे खासदार म्हस्के म्हणाले. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हा त्यांच्या नावाने तुम्ही कायम बोटं मोडली. जिथे शिवसेना कमकुवत आहे तिथं मला जबाबदारी द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. तेव्हा बाळासाहेब देखील राज ठाकरेंवर जबाबदारी सोपवणार होते, मात्र त्यावेळी उबाठाने घर सोडून जाण्याची धमकी बाळासाहेबांना दिली आणि पक्ष संघटना काबीज केली, असा गौप्यस्फोट खासदार म्हस्के यांनी केला. नारायण राणे यांच्याबाबतीत देखील त्यांनी धमकीचे अस्त्र वापरले होते. ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र काम केले होते. राज ठाकरे आणि शिवसेना एकाच विचाराचे आहेत. मात्र ज्या बाळासाहेबांनी कायम काँग्रेसला विरोध केला त्या नेत्यांच्या उंबरठ्या बाहेर तुम्हाला उभे राहावे लागते, अशी टीका त्यांनी उबाठावर केली.

खासदार म्हस्के पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या तोंडी बनावटगिरी करुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करता, कारण थेट टीका करण्याची तुमच्यात हिंमत नाही. नकली आवाज देऊन बाळासाहेबांचा वापर करताय कारण तुम्ही बनावट आहात, अशी टीका खासदार म्हस्के यांनी उबाठा गटावर केली. विधानसभेला त्यांनी १०० जागा लढल्या व केवळ २० जागी निवडून आले आणि शिवसेनेने ८० जागा लढल्या आणि ६० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोण हे लोकांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले. नाशिक मेळाव्यात उपस्थित लोकांमधील बहुतांशजण महिनाभरात तुम्हाला सोडून जातील, असा दावा खासदार म्हस्के यांनी केला.

संत्रा राऊत यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांबरोबर केली यावर खासदार म्हस्के यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणारे तुम्ही कोण, तुमची योग्यता काय? छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी बलिदान दिले आणि तुम्ही खुर्चीसाठी हिंदुत्व सोडले, मुस्लिम मतांसाठी मुल्ला मौलवींना पायघड्या घातल्या होत्या, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे ते म्हणाले. ममता बॅनर्जींना मातोश्रीवर बोलावून सँडविच खायला घालता, मात्र बंगालमध्ये हिंदूंवर सुरु असलेल्या अत्याचारावर तुम्ही एक शब्द काढला नाहीत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. महापालिका निवडणुका रखडल्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप खासदार म्हस्के यांनी केला. मुंबई महापालिकेतील पैसा खाऊन तुम्ही गब्बर झाला आहात. कोविड काळातील खिचडी, ब़ॉडीबॅग खरेदी, पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा यावर संत्रा राऊत यांनी बोलावे, असे प्रतिआव्हान खासदार म्हस्के यांनी दिले.

*राऊत यांना धर्मवीर दिघेंचा कायम मत्सर*
संत्रा राऊत यांना धर्मवीर आनंद दिघेंबाबत कायम मत्सर होता. लोकप्रभामध्ये संत्रा राऊत यांनी दिघेंची मुलाखत घेऊन जो लेख लिहला त्यामुळे दिघेंना टाडाखाली अटक झाली होती, असा गौप्यस्फोट खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केला. धर्मवीर दिघे यांचे नाव देखील घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे खासदार म्हस्के यांनी संत्रा राऊत यांना खडसावले. लोकसभा निवडणुकीवेळी उबाठा गटाने ठाण्यातील लोकांना आवाहन केले होते की धर्मवीर आनंद दिघेंचा खरा शिष्य कोण, मात्र राजन विचारे त्यांच्या वॉर्डमध्ये देखील पिछाडीवर राहिले. ठाण्यातील लोकांनी धर्मवीर यांचा खरा शिष्य कोण हे दाखवून दिले, असे खासदार म्हस्के म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech