नागपूर : मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये पराभूत उमेदवारांनी महायुती पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला आव्हान दिले आहे. या प्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. त्यांच्याविरुद्ध दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविलेले प्रफुल्ल गुडधे यांनीसुद्धा निवडणूक याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणी, बुधवारी भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार मनोज कायंदे आणि भाजप आमदार देवराव भोंगळे यांना समन्स बजावले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला 26 पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकांच्या सुनावणीवर वेगवेगळ्या आमदारांना समन्स बजावण्यात येत आहे. गुरूवारी भाजपचे आमदार मोहन मते, चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनासुद्धा न्यायालयाने समन्य बजावला आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली. दक्षिण नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मते यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांनी तर चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्याविरुद्ध कांग्रेसचे सतीश राजूरकर यांनी निवडणूक याचिका दाखल केल्या आहे. ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही. निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केली नाही, आणि पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्रमांक १७ दिले जात नाही, असा आरोप या याचिकेत आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, व्हीव्हीपॅटची मोजणीही केली जात नाही. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि इतर प्रतिवादींची नावे काढून टाकण्याचे आदेश देत केवळ विजयी उमेदवारांना नोटीस बजावली. तसेच, फडणवीस यांना 8 मेपर्यंत, मोहन मते यांना ६ मे तर कीर्तिकुमार भांगडियांना ८ मे पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड्. आकाश मून यांनी युक्तीवाद केला.