सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार व शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र यावी यासाठी मी विठुरायाकडे कोणतेही मागणे मागितले नाही आणि ते मागण्याचे कोणते कारणही नाही, असे सांगत सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार सुनील तटकरे सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी गुरुवारी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकीकरणावर भाष्य केले.
तटकरे म्हणाले, ‘‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी पांडुरंगाला काही मागण्याचे कारण येत नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी ‘एनडीए’सोबत जाण्याचा एकत्रित निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करत राहू. महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत हे मागणे विठुरायाच्या चरणी घातले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाविषयी विचारले असता त्यांनी उत्तर न देता मी सात्त्विक माणूस आहे, असे म्हटले.