पुणे : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी आलीच पाहिजे, असं परखड मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आपली मातृभाषा ही मराठी आहे. त्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात दर्जा देण्याचे धाडस केवळ मोदींनी केल्याचा उल्लेख देखील यावेळी अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, जगामध्ये बहुतांश देशात इंग्रजी भाषा बोलली जाते. भारतात हिंदी भाषा बोलली जाते. ती राष्ट्रभाषा आहे, यावरून अनेक वाद आहेत. मी त्यात जाणार नाही. परंतु, ज्या पद्धतीने बहुतांश देशांमध्ये इंग्रजी बोलली जाते त्याचप्रमाणे तिन्ही भाषा बोलल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपल्या मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे.