मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं अखेर गेल्या महिन्यात २० मार्च रोजी संपुष्टात आले.घटस्फोट घेतल्यानंतर धनश्री तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. धनश्री उत्तम नृत्यांगणा आहे आणि तिच्या नृत्याचे अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्यांगणा असण्याबरोबरच धनश्री एक अभिनेत्री आहे आणि लवकरच ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. याबद्दल धनश्रीने स्वत:च माहिती दिली आहे.
धनश्रीने स्वतः तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिला चित्रपट येणार असल्याचे म्हटलं आहे. धनश्री बऱ्याच दिवसांपासून हैदराबादमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. याच चित्रीकरणाचे आणि टीमचे काही खास क्षण तिने पोस्टद्वारे शेअर केले आहेत. ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिल राजू यांच्या प्रॉडक्शनच्या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. दरम्यान, धनश्रीच्या या पोस्टमधून तिच्या चित्रपटाचे किंवा भूनिकेचे नाव जाहीर झालेलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिच्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाच्या नावाविषयीजी उत्सुकता व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या आधी धनश्रीचं एक गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘देखा जी देखा मैंने’ असं या गाण्याचं नाव असून घटस्फोटाच्या सुनावणी दिवशीच हे गाणं प्रदर्शित झालं होतं.
धनश्री व चहल यांच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर, मोठ्या थाटामाटात डिसेंबर २०२० मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघं सतत एकत्र दिसायचे. त्याचबरोबर सोशल मीडियावर एकत्र रील व्हिडीओ शेअर करायचे. पण २०२३ मध्ये धनश्री-चहलच्या नात्यात तेढ निर्माण होतं असल्याचं समोर आलं. दोघं विभक्त होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आणि अखेर २० मार्च २०२५ रोजी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.