तिरुअनंतपुरम : मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाको याला पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती समोर आलीय. शाइन पोलिसांच्या ड्रग्स विरोधी कारवाईपासून बचाव करण्यासाठी काही दिवसांपूर्वी फरार झाला होता.कोचीतील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारून त्याने पळ काढला होता. पण शाइनला पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
१६ एप्रिल २०२५ रोजी रात्री कोचीतील एका हॉटेलमध्ये ड्रग्स विरोधी विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाई दरम्यान, शाइन टॉम चाको तिसऱ्या मजल्यावर राहत होता. पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच, त्याने खिडकीतून उडी मारून खाली असलेल्या एका पत्र्यावर उतरण्याचा प्रयत्न केला. पत्रा तुटल्यामुळे, तो थेट दुसऱ्या मजल्यावरील स्विमिंग पूलमध्ये पडला आणि नंतर जिन्याचा वापर करून हॉटेलमधून पळून गेला. शाइन जरी पळाला असला तरीही पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
शाइन टॉम चाको याच्यावर यापूर्वीही ड्रग्स संबंधित प्रकरणांमध्ये आरोप झाले आहेत. २०१५ मध्ये त्याच्यावर आणि इतर सहा जणांवर ड्रग्स बाळगल्याचा आरोप होता, ज्यातून तो २०२५ मध्ये निर्दोष ठरला होता. तसेच अभिनेत्री विंसी अलोशियसने त्याच्यावर चित्रपटाच्या सेटवर ड्रग्सच्या प्रभावाखाली असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला. शाइनने अनेक मल्याळम इंडस्ट्रीतील सिनेमांमध्ये काम केलंय. शाइनच्या अटकेमुळे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.