शिवसेना संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे २४ ला सिंधुदुर्गात

0

आमदार निलेश राणे यांची माहिती शिवकार्य सदस्य नोंदणीचा शुभारंभ
सिंधुदुर्ग : बाळासाहेबांची शिवसेना हीच शिंदे शिवसेना आहे, म्हणूनच विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण निशाणीवर शिवसेनेचे ५७ आमदार व अपक्ष तीन आमदार निवडून आले. या जिल्ह्यात मी स्वतः व दीपक केसरकर विजय झालो. हे सर्व कार्यकर्त्यांमुळे व जनतेमुळे शक्य झाले आहे. म्हणूनच या जिल्ह्यात २४ एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह जनतेने उत्स्फूर्त सहभागी व्हावे व शिवसेनेचे सभासद होण्यासाठी शिवकार्य सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केले. सिंधुनगरी येथील शिवसेना कार्यालयात आमदार निलेश राणे यांनी शिवकार्य सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, संजू परब, संजय पडते, सौ दीपलक्ष्मी पडते, सचिन वालावलकर, आदी नेत्यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सरपंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला संधी मिळाली व आपल्या सर्वांच्या आशीर्वामुळे मी आमदार झालो. संघटनात्मक ताकद काय असते हे प्रत्येकाला समजले आहे. शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्याला प्रेरणा आणि उत्साह देणार असून हा पक्ष संघटित व्हावा आणखी मजबूत हवा यासाठी या पक्षाची सदस्य नोंदणी महत्त्वाची आहे. जिल्ह्यात आपले दोन आमदार असून ही संघटनात्मक ताकद मोठी करण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वी या जिल्ह्यात पन्नास हजार सदस्य नोंदणी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करावे. यातील कुडाळ मालवण मतदार संघात तीस हजार, सावंतवाडी मध्ये यापूर्वी सदस्य नोंदणी झालेली असल्यामुळे आणखी दहा हजार, वा कणकवली मध्ये दहा हजार अशी सदस्य नोंदणी करा लवकरच आपण सदस्य नोंदणी दोन लाखाच्या वर करू यासाठी सर्वांनी काम करा, बूथ प्रमुख शिवदूत या सर्वांनी यात उत्स्फूर्त सहभागी व्हा, संघटनात्मक ताकद वाढली की आपोआप आपली ताकद वाढली असे समजा. कोणतेही चुकीचे काम करू नका असे आवाहन श्री. राणे यांनी केले. यावेळी संजू परब, दत्ता सामंत, संजय पडते यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी शिवकार्य सदस्य नोंदणीच्या मफॉर्मचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech