मुंबई : काळाची गरज ओळखून रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून जगभरात भारतीय कुशल मनुष्यबळ पुरवत आहे, ही आनंदाची बाब आहे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.
एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दुसऱ्या वर्धापन दिनाचा समारोप कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या वर्धापन दीन समारोपात कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सिताराम, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, कौशल्य विभाग आयुक्त नितीन पाटील उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने AI तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य आणि मीडिया या क्षेत्रात कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाचा प्रारंभ केला आहे, हे अतिशय आनंददायक आणि उल्लेखनीय आहे. बदलत्या काळात आपल्या पारंपरिक कौशल्याच्या पलीकडे जाऊन आपण नवी पिढी घडवली पाहिजे, त्यासाठी आपल्या शिक्षकांनीही नवी संकल्पना समजून घेऊन त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे. रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विभागाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर या दृष्टिकोनातून योगदान देत असल्याबाबत त्यांचेही अभिनंदन करतो असेही, राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी नमूद केले.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला ‘ विकसित राष्ट्र ‘ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरू केलेला ‘स्किल इंडिया ‘ हा उपक्रम या संकल्पात महत्वाचा भाग आहे. जागतिक कौशल्य आत्मसात करताना परदेशी भाषा शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. राज्याच्या कौशल्य विभागाने जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकवून मनुष्यबळ पुरवण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याचेही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी एखादी तरी जागतिक भाषा शिकावी, असे आवाहनही यावेळी राज्यपालांनी केले. जगात आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रात मोठा वाव असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) कौशल्य, भारतीय मूल्ये आणि एकात्मिक शैक्षणिक प्रणालीवर भर देत आहे. मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख संधी उपलब्ध होऊ शकते. यासंदर्भात रतन महाराष्ट्र विद्यापीठाने आधीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स( AI ), रिअल इस्टेट, सेवा क्षेत्र, आणि औद्योगिक व्यवस्थापनात हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे, ही अतिशय जमेची बाजू असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे आमचे ऊर्जास्त्रोत असल्याचे सांगितले. त्यांच्या सहकार्याने विद्यापीठ नव्या उंचीवर जाणार असल्याचेही लोढाजी म्हणाले.
रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती अपूर्वा पालकर यांनी यावेळी विद्यापीठात सुरू असलेल्या कोर्सेसची तसेच मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नागपूर केंद्रात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या विद्यापीठात शिक्षित झालेला स्नातक जगाच्या कानाकोपऱ्यात आपले भवितव्य घडवायची क्षमता ठेवतो. राज्यशासनाच्या वतीने लवकरच अद्ययावत सुविधांसह पनवेल इथे विद्यापीठाची भव्य वास्तू उभारण्यात येणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ. पालकर यांनी यावेळी दिली.
राज्यातल्या युवकांना जर्मनीत काम करण्याची संधी कौशल्य विभागाने मिळवून दिली असून विविध स्तरावर यावर उपक्रम राबवण्यात येत असल्याचे कौशल्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव, आयुक्त श्रीमती मनीषा वर्मा यांनी स्पष्ट केले. रतन टाटा महाराष्ट्र विद्यापीठात थिअरी बरोबरच प्रशिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अनेक उद्योगक्षेत्राकडून या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मोठी मागणी निर्माण होणार आहे. परदेशी कंपन्यांसोबत कराराच्या प्रक्रिया पूर्णत्वाला जात असून हे विद्यापीठ जगात एक ब्रँड म्हणून नावाजले जाईल, असा विश्वास वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या सांगता समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. आदर्श प्राध्यापक संदीप जैन, आदर्श युवा प्राध्यापक अनिरुद्ध चव्हाण, प्रशासकीय उल्लेखनीय कार्य मीना श्रीमाळी, ग्रंथपाल मीनाक्षी पाटील तर संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीचे पारितोषिक दीप्ती जाधव यांना देण्यात आले. उत्कृष्ट स्टार्ट अप गटात एक लाख रुपयांचे पारितोषिक वैष्णवी कोठावडे यांना दुसरे दोन लाखांचे पारितोषिक साक्षी पारेख यांना तर तीन लाखांचे पाहिले पारितोषिक विष्णुदास विश्वकर्मा यांना राज्यपालांचे हस्ते देण्यात आले.