भोपाळ : दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवाना येथून ८ चित्ते भारतात आणले जाणार आहे. हे चित्ते २ टप्प्यात आणणार असून मे महिन्यात ४ चित्ते भारतात येतील अशी माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाच्या (एनटीसीए) अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत चित्ता प्रकल्प आढावा बैठकी घेण्यात आली. या बैठकीतील माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना आणि केनिया येथून आणखी चित्ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन टप्प्यांत ८ चित्ते भारतात आणले जातील. मे महिन्यापर्यंत बोत्सवाना येथून ४ चित्त्यांना भारतात आणण्याची योजना आहे. त्यानंतर आणखी ४ चित्त्यांना आणण्यात येईल. याबाबत भारत आणि केनिया यांच्यातील करारावर सहमती झाल्याचे एनटीसीए अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीत, एनटीसीए अधिकाऱ्यांनी माहिती दिली की देशातील चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत ११२ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे, त्यातील ६७ टक्के खर्च हा मध्य प्रदेशातील चित्ता पुनर्वसनासाठी करण्यात आला आहे. चित्ता प्रकल्पांतर्गत, या चित्त्यांना आता टप्प्याटप्प्याने गांधी सागर अभयारण्यात स्थलांतरित केले जाईल. हे अभयारण्य राजस्थानच्या सीमेला लागून आहे. यासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्यात आंतरराज्य चित्ता संवर्धन क्षेत्र स्थापन करण्यासाठी तत्वतः करार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.