महाराष्ट्र हिताऐवजी स्वार्थ साधण्याचा उबाठा मनसेचा प्रयत्न – संजय निरुपम

0

मुंबई : महाराष्ट्र हिताच्या नावाने राजकारण करणाऱ्या उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले. दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या संपलेलेल असून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी दोन्ही नेत्यांचा प्रयत्न आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरुपम पुढे म्हणाले की, उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांचा त्याग केला आणि स्वत:साठी, सत्तेसाठी, स्वत:च्या कुटुंबासाठी उबाठाने हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि काँग्रेससोबत गेले. त्यामुळे उबाठाचा जनाधार कमी झाला. ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळेच उबाठा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रतिसाद दिला आहे. मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. राज्यात उबाठा गट आणि मनसे दोन्ही पक्ष कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच होते. व्यावसायिक भाषेत बोलायचे झाल्यास तोट्यातील दोन कंपन्या एकत्र आल्या तरी एक नफ्यातील कंपनी बनत नाही, असा टोला निरुपम यांनी लगावला.

उबाठा आणि मनसेच्या महाराष्ट्र हिताबाबत निरुपम पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील मतदारांनी ज्यांना नाकारले ते लोक महाराष्ट्र हिताचा विचार करणार का, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला. यातील एका पक्षाचे महाराष्ट्र हित म्हणजे मशिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेतला होता. दुसऱ्या पक्षाचे महाराष्ट्र हित म्हणजे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध संसदेत आणि संसदेबाहेर भूमिका घेतली आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे महाराष्ट्र हित किती ढोंगी आहे, हे दिसते, असे निरुपम म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते महाराष्ट्र हितासाठी कटिबद्ध आहेत, असे निरुपम म्हणाले. ज्यावेळी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तेव्हा महाराष्ट्र हितासाठी शिंदे यांनी ऐतिहासिक उठाव केला आणि शिवसेना वाचवली होती. उबाठा आणि राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या रक्ताचे वारस असले तरी त्यांच्या विचारांचे खरे वारस एकनाथ शिंदेच आहेत, असे निरुपम म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech