अमरावतीत विद्यार्थी छर्ऱ्याच्या बंदुकीसह पोहोचला शाळेत, डॉक्टर वडिलांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

0

अमरावती : सातव्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थी थेट बंदूक घेऊन शाळेत पोहोचला. या मुलाच्या स्कूल बॅगमध्ये बंदूक असल्याची माहिती शाळेकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस शाळेत पोहोचले व मुलाकडून बंदूक ताब्यात घेतली. ही बंदूक छर्रे मारण्याची असल्याचे समोर आले असून, ती बंदूक त्याच्या वडिलांनी घरात ठेवल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी २१ एप्रिलला गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या डॉक्टर वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोमवारी दुपारी शाळेत आल्यानंतर सातवीतील या विद्यार्थ्याच्या स्कूल बॅगमध्ये बंदूक असल्याची बाब शिक्षकांना लक्षात आली. या प्रकाराने शिक्षकही चांगलेच घाबरून गेले. त्यांनी तातडीने याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. शाळकरी मुलाजवळ बंदूक असल्याची माहिती मिळताच पोलिस तातडीने शाळेत पाहेचले. त्यावेळी या मुलाच्या स्कूल बॅगमधून पोलिसांनी बंदूक ताब्यात घेतली. ही बंदूक लोखंडाची आहे. पोलिसांनी बारकाईने निरीक्षक केले असता ही बंदूक छर्रे मारण्याची असल्याचे समोर आले. बंदूक छर्रे मारण्याची असली तरीही ती घातक आहे. दरम्यान, त्या मुलाला विचारले असता त्याने सांगितले की, घरी ठेवलेली बंदूक मी आणली. पण कशासाठी आणली, त्याचा उद्देश काय होता, याबाबत माहिती समोर आली नाही. या प्रकारानंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलवले. काही वर्षांपूर्वी मुंबईतून छर्रे मारण्याची ही बंदूक आपण खरेदी केली होती, ती घरात ठेवली होती. मुलाने तीच उचलून आणली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech