मुंबई : माहिती अधिकारांतर्गत मोठ्या संख्येने द्वितीय अपील दाखल केल्यावर ते गांभीर्याने न घेता माहिती अधिकाराचा दुरुपयोग आणि राज्य माहिती आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने श्री. केतन रसिकलाल मेहता आणि श्री. किरण ए. के. यांच्या द्वितीय अपिले आणि तक्रार अर्जांची सुनावणी पुढील तीन वर्षांपर्यंत घेण्यात येणार नाही, असे आदेश राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी दिले आहेत.
श्री. मेहता आणि श्री. करण ए. के. यांनी मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज केला होता. जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीने समाधान न झाल्याने दोघांनी प्रथम अपील दाखल केले होते. त्यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आले होते.
प्रथम अपिलीय अधिकाऱ्याच्या निर्णयामुळेदेखील समाधान न झाल्याने श्री. मेहता आणि श्री. किरण दोघांनी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिल दाखल केले होते; परंतु त्यानंतर आपल्याला माहिती प्राप्त झाल्याचेही दोघांनी राज्य माहिती आयोगाला कळविल होते. त्यांच्या दोघांच्याही विधानांत विसंगती आढळून आली. त्यामुळे दोघांच्या अपिलांवर दोन वेळा सुनावणी ठेवण्यात आली होती. पहिल्या वेळी श्री. किरण अनुपस्थित होते; दुसऱ्यांदा ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. श्री. मेहता मात्र दोन्ही वेळा अनुपस्थित होते. इतर प्रकरणांतही दोघांनी मोठ्याप्रमाणावर द्वितीय अपील दाखल केले आहेत; परंतु त्यावरील सुनावणीबाबत दोघांमध्ये गांभीर्य दिसून येत नाही; तसेच त्यांनी माहिती अधिकारांचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होते, असे राज्य माहिती आयोगाचे मत झाल्याने हा आदेश देण्यात आला आहे.
कायद्याच्या गैरवापरास प्रतिबंध
माहिती अधिकाराचा गांभीर्यपूर्वक वापर करणारे प्रामाणिक अर्जदार आणि अपिलार्थींना वेळेवर न्याय मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर द्वितीय अपिलांची मोठी संख्या लक्षात घेता अशा पद्धतीने माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
– शेखर चन्ने, राज्य माहिती आयुक्त, कोकण खंडपीठ