मुंबई : राज्यातील ओला इलेक्ट्रॉनिक्स मोबीलिटी लिमिटेडच्या शोरूमवर आरटीओने कारवाई केली आहे. व्यवसाय प्रमाणपत्रशिवाय किंवा एकाच ट्रेंड सर्टिफिकेटच्या आधारे अनेक दुकाने थाटल्या प्रकरणी ही कारवाई ककरण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात ओलाची १२१ शोरूम ट्रेड सर्टिफिकेटशिवाय सुरू असून, ती तत्काळ बंद करण्याच्या सूचना आरटीओने केल्या आहेत. यासाठी आतापर्यंत आरटीओकडून १०९ कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील ५५ शहरांमध्ये सुरू असलेल्या ओलाच्या शोरूम किंवा स्टोअर कम सर्व्हिस सेंटरची आरटीओने तपासणी केली. त्यात ओलाचे १४६ शोरूम असून, त्यापैकी २७ जणांकडे ट्रेड सर्टिफिकेट असल्याचे आढळले. त्यामुळे आरटीओकडून ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या सर्व्हिस सेंटर व शोरूम बंद करावे, असे बजावण्यात आले होते. त्यानुसार ७५ शोरूम बंद केले आहेत. अजूनही व्यवसाय करणाऱ्या शोरूमवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. आतापर्यंत १९२ वाहने जप्त केली आहेत. राज्यात ओलाच्या १४६ शोरूमच्या माध्यमातून हजारो वाहनांची विक्री झाली आहे. ओलाच्या अनेक ट्रेड सर्टिफिकेट नसलेल्या शोरूमच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात २३ हजार ८०२ वाहनांची विक्री झाली.त्यांचा तपास चेसिस प्रिंटनुसार असलेल्या नोंदणीच्या माध्यमातून सुरू आहे.