ठाणे – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात अंमली पदार्थांची साठवणूक, विक्री, निर्मिती होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील रासायनिक कंपन्या, गोदामे, फार्म हाऊस इत्यादींची प्रभावीपणे तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समिती व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी समितीच्या सदस्य सचिव अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली धाटे, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक अमर मराठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस निरीक्षक निरज चौधरी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एल. के. घोरने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त रा.प. चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय साळुंखे, राज्य उत्पादन विभागाचे उपअधीक्षक एस.टी. माळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे आदीसह समितीचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात इतर राज्यातून अथवा परदेशातून कोणत्याही अंमली पदार्थांची तस्करी होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. अशा घटनांच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी आराखडा तयार करावा. जिल्ह्यात कोरेक्स, बटण तसेच इतर अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या औषध दुकानांची तपासणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी. अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल असलेल्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
यावेळी तीनही पोलीस आयुक्तालयांच्या वतीने सन 2023 व 2024 मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली.