शहापूर: भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात महायुतीची वज्रमुठ झाली असून, निवडणुकीच्या प्रचारात एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात शहापूर विधानसभा मतदारसंघातून एक लाख मतांचे ध्येय ठरविण्यात आले. या मेळाव्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा शहापूर शहरात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरोडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते व भिवंडी लोकसभा प्रभारी जगन्नाथ पाटील, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे, किसन भांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किसन तारमळे, कल्पना तारमाळे, संजय पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात, तालुकाध्यक्ष जयवंत थोरात, मनसेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र बिडवी, भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनक, तालुकाप्रमुख भास्कर जाधव, जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड, महिला मोर्चा प्रमुख शीतल तोंडलीकर, प्रकाश वेखंडे, राजेश तिवरे, नंदकुमार मोगरे आदी उपस्थित होते.
यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाच्या जनतेने हाती घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार केला आहे. देशाची भविष्य घडविणारी ही निवडणूक असून, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहापूर तालुक्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, कुणबी सेना, रिपब्लिकन पक्ष, रासप आदी पक्षांची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे शहापूर मतदारसंघात महायुतीला किमान एक लाख मते निश्चित पडतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. या सभेत इतर वक्त्यांनीही महायुतीला विक्रमी मतदान होणार असल्याचे भाकीत व्यक्त केले.
शहापूरातील पाणीटंचाई संपुष्टात आणणारा भावली धरण प्रकल्पाचा पाया २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रचला होता. तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर कळस चढविला आहे. भावली धरणाचे संपूर्ण श्रेय या दोघांचे आहे. आगामी काळात पाणीटंचाई नक्कीच दूर होईल, असे नमूद करून उमेदवार कपिल पाटील यांनी शहापूरच्या विकासासाठी महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचे स्पष्ट केले.
खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अनेक वर्षांपासून रखडलेला वासिंद रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल व बदलापूर होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले. तर आसनगाव येथे होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. भिवंडी मतदारसंघात अनेक कामे सुरू असून, कामांबाबत प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना कार्यकर्त्यांनी उत्तरे द्यावीत, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने झटावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहापूर तालुक्यासह मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिक कार्य करेल, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी केले.