मुंबई : महिनाभरावर लोकसभा निवडणूक आली तरी महायुतीच्या मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री नागपूर मुक्कामी यासंदर्भात राज्यातील महत्वाच्या नेत्यांसमवेत चर्चा विचार विनीमय केला असून दक्षीण मुंबई आणि उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य मुंबईत सक्षम उमेदवार मिळण्याबाबत ठोस निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.भारतीय जनता पक्षातील जाणकार सूत्रांच्या माहितीनुसार दक्षीण मुंबईत शिंदे सेनेकडून यशवंत जाधव, मनसेकडून बाळा नांदगावकर, भाजपकडून मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा , कुलाब्याचे आमदार राहूल नार्वेकर असे पर्याय तपासून पाहण्यात आले मात्र शिवसेनेचे (उध्दव) उमेदवार अरविंद सावंत यांना मात देवू शकेल अशी पात्रता या कुणाही उमेदवारात नसल्याचे तीनवेळा पक्षांतर्गत सर्वेक्षण केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राहूल नार्वेकर यांनी अखिल भारतीय सेनेचे शिक्षा संपवून परत येणारे प्रमुख अरूण गवळी यांच्या मदतीने भाजपच्या तिकीटावर नशिब अजमावण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
तर उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पुनम महाजन यांच्या ऐवजी बॉलीवूडच्या महान हस्तीपैकी एश्वर्या राय बच्चन किंवा त्यांचे पती अभिषेक बच्चन, सलमान खान किंवा अक्षय कुमार अश्या पर्यायांवर विचार केला जात आहे. वांद्रे, खार, सातंक्रुझ पार्ले, जोगेश्वरी अंधेरी असा बहुभाषिक कॉस्मोपोलीटीन मतदारसंघ असलेल्या या भागात शिंदे यांच्या शिवसेनेचे बाबा सिद्दीकी किंवा त्यांचा आमदारपूत्र झिशान सिद्दीकी यांनाही अजमावले जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त त्यांचे बंधू संजय दत्त यांच्या सोबत सिद्दीकी यांनी अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ते या भागात परिचीत आहेत. शिवाय कॉंग्रेसच्या अंडर करंट मधून या भागात भाजपला बळ मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूकीला महिनाभर राहिला तरी भाजपला मुंबईच्या महत्बाच्या तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवारच मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उत्तर मध्य मुंबईत शिवसेनेचे (उध्दव) अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते कामाला लागले आहेत. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून येवून निवडणूक लढण्यास संजय निरुपम उतावळे आहेत पण भाजपच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या ऊमेदवारीला समर्थन नसल्याने ते प्रभावी ठरणार नाहीत. किर्तीकर यांच्यासमोर त्यांचे वडील गजानन किर्तीकर भाजपच्या तिकीटावर लडण्यास तयार नाहीत. त्यांचे वय झाले असून मुलाच्या विरोधात कदाचित ते शिंदे सेनेतून लडण्यास तयार होवू शकतात. मात्र शिंदे सेनेला या भागात भाजपचे मतदार कितपत प्रतिसाद देतील असा प्रश्न असल्याचे या सूत्रांनी सांगितले. भाजपचे राजहंस सिंग यांच्या नावाला अद्याप भाजपकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. तर मराठी उमेदवार म्हणून पराग अळवणी, शिंदे सेनेत आलेले रविंद्र वायकर किंवा भाजपचे आशिष शेलार यापैकी शेवटच्या क्षणी शेवटच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.