मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यात पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पक्ष फोडून राज्यात झालेले सत्ता परिवर्तन यामुळे विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्यासाठी मोदी यांची सभा महायुतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ २९ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.