बातम्या वाचताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच बेशुद्ध

0

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे. ज्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांनी महत्त्वाचे काम नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, त्याशिवाय उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, उष्माघाताचा फटका अनेकांना बसत असून यामुळे पश्चिम बंगालमधील एक न्यूज अँकर लाइव्ह बातमी वाचताना भोवळ येऊन पडल्याची घटना घडली आहे.

महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. पश्चिम बंगालमध्ये तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघाताने बाधित झालेले रुग्ण आढळू लागले आहेत. अशातच पश्चिम बंगालमधील डीडी बांगलाच्या अँकर लोपामुद्रा सिन्हा या बातम्या वाचत असतानाच भोवळ येऊन पडल्याची माहिती समोर आली आहे. लोपामुद्रा यांचा भोवळ आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेनंतर लोपामुद्रा यांनी स्वतः फेसबूकवर लाइव्ह येऊन शनिवारी दूरदर्शनच्या स्टुडिओत नेमके काय झाले याबाबत माहिती दिली आहे.

लोपामुद्रा सिन्हा यांनी फेसबूकच्या पोस्टमधून याबाबत माहिती देताना म्हटले की, लाइव्ह बातम्या वाचत असताना माझा रक्तदाब (बीपी) कमी झाला होता. त्यामुळे मी बेशुद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. त्या दिवशीदेखील मला बरे वाटत नव्हते. मात्र मला वाटले थोडं पाणी प्यायल्यावर बरे वाटेल. परंतु, तसे झाले नागी. मी कधीच स्टुडिओत पाणी घेऊन जात नाही. पण त्यादिवशी मी स्टुडिओमधील व्यवस्थापकाला इशारा करून पाणी आणून देण्यास सांगितले. मात्र त्यांनी पाणी आणण्यापूर्वीच मी बातम्या वाचत असताना बेशुद्ध झाले. मी त्यावेळी पाणी पिऊ शकले नाही.

बातम्या वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर अंधारी येत होती, तेव्हा मी पाहिले की, चार बातम्या बाकी आहेत. मला वाटले या चार बातम्या मी पूर्ण करू शकेन. त्यातल्या दोन बातम्या मी कशाबशा वाचल्या. त्यानंतर तिसरी बातमी उष्माघाताशी संबंधित होती. ती बातमी वाचताना मला हळूहळू भोवळ येऊ लागली. त्यावेळी मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. मी ही बातमीदेखील पूर्ण करेन असे मला वाटले होते. परंतु, तेवढ्यात मला दिसणे बंद झाले, असे लोपामुद्रा सिन्हा यांच्याकडून सांगण्यात आले.

त्यानंतर, माझ्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार होता. मला टेलिप्रॉम्प्टर दिसतच नव्हता. माझ्यासमोरचे दृष्य हळूहळू पुसट होत गेले. सुरुवातीला वाटलेले की, टेलिप्रॉम्प्टरच धिम्या गतीने चालत आहे. मात्र मलाच दिसेनासे झाले होते. तेवढ्यात मी डोळे मिटले, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. लोपामुद्रा यांची प्रकृती ठीक असून त्यांनी तेव्हा नेमके काय काय घडले, याबाबतची माहिती फेसबूकच्या माध्यमातून दिली.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढले आहे. राज्यातील बर्दवान जिल्ह्यातील पानागढमध्ये राज्यातील सर्वाधिक 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील दोन-तीन दिवसांमध्ये तापमान आणखी वाढेल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech