पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारने आता वाय प्लस सुरक्षा पुरवली आहे. बारामती लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा झाल्यापासून पार्थ पवार सातत्याने प्रचार करताना दिसत आहेत. मध्यंतरी त्यांनी गुंड गजानन मारणे याचीसुद्धा भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची समजूत घालणार असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांना द्यावे लागले होते.
मध्यंतरी पार्थ पवार प्रचारातून गायब झाले होते. त्यावरसुद्धा अजित पवार यांनी ते गनिमी काव्याने प्रचार करीत असल्याचे म्हटले होते. परंतु आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचार करणा-या आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केला होता. तसेच कार्यकर्त्यांना फोन करून धमकावले जात असल्याचेही म्हटले होते.
विरोधकांना मिळाला आयता मुद्दा- काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. मात्र सरकारने आणि पोलिस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पार्थ पवार यांनी कुठलीही मागणी केली नसताना अचानक सरकारकडून त्यांना सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे विरोधकांना निवडणुकीमध्ये टीका करण्यासाठी आयताच मुद्दा मिळाला आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अशातच उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र पार्थ पवारांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पार्थ यांना सुरक्षा दिल्यावरून राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, जर गरज असेल तरच सुरक्षा द्यावी.