काँग्रेसला अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे

0

मुरादाबाद – काँग्रेसला अल्पसंख्याकांना गोमांस खाण्याचा अधिकार द्यायचा आहे. हे एकप्रकारे गौहत्येला परवानगी देण्यासारखे आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. शुक्रवारी संभल येथील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. त्यांच्या या टीकेनंतर आता देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी संभल लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार परमेश्वर लाल सैनी यांच्या प्रचारार्थ मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी येथे योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसचे निर्लज्ज लोक अल्पसंख्याकांना ‘गौमांस’ (गाईचे मांस) खाण्याचा अधिकार देण्याचे वचन देत आहेत. मात्र, हिंदू धर्मग्रंथात गाईला मातेसमान मानले जाते. खरं तर काँग्रेसला गायी कसायाच्या हाती द्यायच्या आहेत. देश हे कधीही स्वीकारणार नाही”, असे ते म्हणाले.

“देशातील महिलांची संपत्ती जप्त करून ती रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांमध्ये वाटप करण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. याचा अर्थ, जर कोणाच्या घरात चार खोल्या असतील तर त्यातील दोन खोल्या या रोहिंग्या आणि बांग्लादेशीत घुसखोरांना देण्यात येईल. एवढेच नाही तर काँग्रेसकडून महिलांचे दागिने ताब्यात घेण्याचेही वचन दिले जात आहे. देश हे कधीही मान्य करणार नाही”, अशी टीकाही योगी आदित्यनाथ यांनी केली.

पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस दुटप्पी असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा लवकरच प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, ज्यावेळी त्यांचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी रामाच्या अस्थित्वावर प्रश्न केले होते. हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech