नवी दिल्ली – सध्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती उत्तम असून त्यांना इन्सुलिनचा डोस सुरु ठेवण्याचा सल्ला एम्सच्या वैद्यकीय पथकाने दिला आहे. आज एम्सच्या पाच डॉक्टरांच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यानंतर केजरीवाल यांना इन्सुलिन सुरु ठेवण्याच्या सूचना तुरुंग प्रशासनाला दिल्या आहेत. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार या वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी करण्यात आली.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या रक्तातील साखर वाढल्यामुळे आपल्याला तुरुंगात इन्सुलिन मिळावे तसेच दररोज खाजगी डॉक्टरशी सल्लामसलत करण्याची परवानगी मागितली होती. यावेळी पत्नीलाही उपस्थित राहण्याची परवानगीही मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी नाकारली होती. शासनाने गठीत केलेल्या वैद्यकीय पथकाकडूनच उपचार घेण्याचे त्यांना कोर्टाकडूव सांगण्यात आले होते. त्यानुसार आज वैद्यकीय पथकाने व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे केजरीवाल यांची तपासणी केली. ही व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे केलेली तपासणी अर्धा तास चालल्याचे तिहार तुरुंगातील सूत्रांनी सांगितले आहे.