मुंबई – राज्यातल्या लोकसभेच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलाय असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत. मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रांमध्ये धडाका लावलाय. शरद पवारांनीही बारामतीसह माढ्यात भेटीगाठींसह सभा सुरु केल्यात. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीनीही पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय.
देशातील दुसऱ्या क्रमांकांचं सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे भाजपच्या 400 पार च्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचं. म्हणूनच की काय यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडाका लावलाय. ज्या मतदारसंघात भाजपला आव्हान वाटतंय त्या मतदारसंघात भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सभा आयोजित केल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपकडून राज्यात एका महिन्यात मोदींच्या 16 सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी काही ठिकाणी सभा झाल्या आहेत.
मोदींच्या प्रचार सभांची सुरुवात झाली 8 एप्रिलला चंद्रपूरमधून. ही ती जागा जिथे सुधीर मुनगंटीवार नको नको म्हणत असताना, त्यांना मैदानात उतरवले गेले. ही ती जागा जिथे पहिल्या टप्प्यातील सर्वात कडवे आव्हान काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी उभे केले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला धावले मोदी. दुसरी सभा दोनच दिवसांमध्ये, शिवसेनेच्या राजू पारवेंसाठी. मतदारसंघ रामटेक. राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार, अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आले. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवा, कार्यकर्ते नवे, पक्ष नवे . त्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने नाराज. त्यामुळे परत एकदा मदतीला मोदी.
भाजपची सर्व्हेची यंत्रणा जबरदस्त मानली जाते. त्यातूनच कुठे जायचे, कोणाला आपली गरज आहे हे हेरला जात असावे यात शंका नाही. त्यातूनच दुसऱ्या टप्प्यात मोदींनी वर्धेत भाजपचे रामदास तडस, नांदेडमध्ये भाजपचेच प्रताप पाटील चिखलीकर तर परभणीत रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतल्या. तडस यांना सुनेच्या आरोपांचा फटका तर चिखलीकरांना मराठा आंदोलकांचा रोष तर जानकरांना बाहेरचा उमेदवार . अशी आव्हाने निर्माण झाली होती. त्यामुळेच या टप्प्यात मोदी मॅजिकची त्यांना सगळ्यात जास्त गरज होती. त्यामुळे निशाण्यावरही आहेत ते मोदीच. त्यानंतर मोदी चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी प्रचार घेणार आहेत. इथंही मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय. अगदी आंदोलकांनी पंकजा मुंडेंसमोर घोषणा दिल्या.
त्यानंतर मोदी अहमदनगरमध्ये प्रचार सभा घेतील. जिथं शिवसेनेच्या शिर्डीतील उमेदवारसह नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी प्रचार करतील. नगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदवारीनं कडवं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे इथंही मोदींच्या गॅरंटीची गरज भासू शकते. शेवटच्या टप्प्यात मोदींनी कल्याण आणि दिंडोरीत सभा घेतील. जिथं ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे अशा जवळपास सहा उमेदावारांठी मोदी आपली गॅरंटी देतील. या सोळा सभांचा विचार केला तर पंतप्रधान मोदी जवळपास तीस मतदारसंघ कव्हर करतील आणि स्वतःची गॅरंटी मतदारांना देतील.