कर्नाटकात – ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात एक मोठं सेक्स स्कँडल उघडकीस आलं आहे. या सेक्स स्कँडलमध्ये अकडलंय ते कर्नाटकातलं सर्वात मोठं राजकीय घराणं. माजी पंतप्रधान एच डी दैवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकीत हे सेक्स स्कँडल उघडकीस आल्यानं कर्नाटकच्या राजकारणात भूकंप झाल्याचं दिसून येतंय.
एच. डी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात त्यांच्याच घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिली. त्यानंतर हासन जिल्ह्यातील होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. प्रज्ज्वल यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडीओ कर्नाटकात व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये कर्नाटकातले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला, पक्षाच्या कार्यकर्त्या, घरकाम करणाऱ्या महिला आणि इतरही काही महिलांचा समावेश आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते जेडीएस पक्षाचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा भारताबाहेर निघून गेले आहेत. शनिवारी बंगळुरु विमानतळावरुन प्रज्ज्वल रेवण्णा जर्मनीतल्या फ्रँकफर्टला रवाना झाले आहेत. जर्मनीतून ते युरोपमधील दुसऱ्या कुठल्यातरी देशात लपून बसल्याचा संशय कर्नाटकातल्या तपास यंत्रणांना आहे.
कर्नाटकातले जो नेता या सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहेत तो प्रज्ज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू आहे. प्रज्ज्वल यांचे वडील एच. डी रेवण्णा यांचाही या सेक्स स्कँडलमध्ये आरोपी म्हणून समावेश करण्यात आला. प्रज्ज्वल रेवण्णा हे जेडीएस पक्षाचे हासन मतदारसंघाचे खासदार आहेत. या वर्षीही त्यांनी जेडीएस पक्षाकडून हासन मतदारसंघातून अर्ज भरला आहे. प्रज्ज्वल यांचे वडील एच डी रेवण्णा हे होलेनरसीपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. देवेगौडा घराण्याचा म्हैसुरु आणि हासन परिसरात प्रभाव आहे.
प्रज्ज्वल रेवण्णा यांचं सेक्स स्कँडल समोर आल्यानंतर काँग्रेसनं ट्विट करत निशाणा साधलाय. जेडीएसला सोबत घेणाऱ्या भाजपवरही काँग्रेसनं टीका केली आहे. काँग्रेसने म्हटलंय की, ‘एचडी देवगौड़ा यांचे नातू प्रज्ज्वल रेवन्ना यांचे हजारो अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलंय. लैंगिक शोषण करताना त्यांनी काही व्हिडीओ चित्रित केले आहेत. ही घटना कर्नाटकसाठी हैराण करणारी आहे. भाजपला या प्रकरणाची आधीच माहिती होती. पण सत्तेची लालस असल्यानं भाजपनं डोळे बंद करुन महिलांची इज्जत लुटणाऱ्या एका बलात्कारी व्यक्तीला एनडीएकडून लोकसभेचं तिकीट दिलं. महिला सन्मामाचं ढोंग करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आता समोर आलाय.’
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. 14 जागांचं मतदान पार पडलंय. तर 14 जागांवर अद्याप मतदान होणं बाकी आहे. प्रज्ज्वल रेवण्णा ज्या हासन मतदारसंघात निवडणूक लढवत होते ती निवडणूक मात्र पार पडलीय. पण उरलेल्या 14 जागांवर या सेक्स स्कँडल प्रकरणाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. दक्षिणेतल्या कर्नाटक या एकमेव राज्याकडून भाजपला सर्वाधिक आशा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपनं 400 पारचं लक्ष्य ठेवलंय. पण जेडीएस नेत्यांचं हे सेक्स स्कँडल प्रकरण भाजपच्या 400 पारच्या आड तर येणार नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.