मुंबई – मुंबईतील आमच्या तिन्ही जागांवर आम्ही विजय मिळवणार असून भाजपाच्याही जागा जिंकून येणार. सहाही उमेदवार जिंकत महायुती मुंबईत षटकार मारणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूकीतील शिवसेनेच्या तीन जागांच्या निवडणूक तयारीचा आज त्यांनी आढावा घेतला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणूकीच्या कामाचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी राहुल शेवाळे व रविंद्र वायकर यांच्या मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते असे त्यांनी सांगितले. या बैठकीविषयी माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतील तीन मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या बैठकीत आपलाच विजय होणार असल्याचा निर्धार घोषित केला आहे. हे पदाधिकाउरी फार अनुभवी आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक निवडणूका लढवल्या आहेत. त्यामुळे आमचा विजय होणार आहे. उद्धव ठाकरे यांची विकेट गेलेली आहे.
लोकांनी आता पाहिले आहे की आम्ही फार चांगले काम करत आहोत. दहा दहा पंधरा वर्ष जी कामे झाली नाहीत ती आम्ही केली आहेत. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे. या बैठकीत आम्ही निवडणूक प्रचार, प्रचाराची दिशा, प्रचाराची धोरणे आदीवर चर्चा झाली. मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नक्कीच सभा देणार. त्यांचे मुंबईवर फार प्रेम आहे. त्यांच्या सभेनंतर त्यांच्या तीन व आमच्या तीन मिळून क्लिन स्विप मारणार. काँग्रेसचे संजय निरुपम येऊन गेले असून तेही दोन दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.