नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये तापमान विक्रमी चाळीस अंश सेल्सियस पोहोचले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बहुतांश पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवेनासे झाले आहेत. त्यावर एका शाळेने फार आगळा वेगळा असा उपाय शोधून काढला. असह्य उष्णतेवर मात करण्यासाठी शाळेने वर्ग खोल्यांचे चक्क स्विमिंग पूलमध्ये रुपांतर केले.म्हणजे वर्गामध्ये गुडघाभर पाणी भरण्यात आले. या पाण्यात डुबक्या मारत मुले आनंदाने शिकतील अशी अफलातून कल्पना शाळा व्यवस्थापनाला सुचली. उत्तर प्रदेशच्या कनौज जिल्ह्यातील महासौनापूर नावाच्या गावातील या प्राथमिक शाळेचा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बच्चे कंपनी वर्गातील या तात्पुरत्या स्विमिंग पुलमध्ये पाण्यात धमाल करताना दिसत आहेत.
याबद्दल बोलताना शाळेचे मुख्याध्यापक वैभव राजपूत आपल्या या अफलातून कल्पनेबद्दल फार आनंदी दिसले. गेल्या दिवसांपासून तापमान ३८-४० अंश सेल्सियवर पोहोचले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थीसंख्या घटली होती. मात्र जेव्हा पासून वर्ग खोल्यांमध्ये पाणी भरण्यात येऊ लागले तेव्हापासून मुले आनंदाने शाळेत येऊ लागली आहेत. पाण्यात डुबक्या मारताना मुले अभ्यासही करीत आहेत,असे राजपूत म्हणाले. मुख्याध्यापक राजपूत हे आपल्या अभिनव कल्पनांसाठी पंचक्रोशीत ओळखले जातात. त्यांच्या डोक्यातून वर्ग खोल्यांचे स्विमिंग पूलमध्ये रुपांतर करण्याची अफलातून कल्पना निघाली आहे.