कल्याण – मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामांच्या माध्यमातून स्वत:ची छाप सोडली आहे. आजची रॅली ही विजयाची रॅली आहे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशिर्वादाने कल्याण डोंबिवली मतदार संघात येत्या निवडणुकीत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील. पाच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विजयाच्या हॅटट्रिकनंतर पुढची पाच वर्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तुमची सेवा करेल, असे ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या प्रचंड रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि महायुतीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण राज्यात महायुतीची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात कडक्याच्या उन्हात देखील कार्यकर्ते प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले होते. कल्याण-डोंबिवलीतील आजची गर्दी त्याचीच साक्ष देत आहे. मागील १० वर्षात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या रॅलीतून दिसली. पुढची पाच वर्ष कल्याण डोंबिवलीसाठी निधी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पहिल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख होती. पण निवडून आल्यानंतर विकास कामातून त्यांनी आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लग्नसराईचा हंगाम सुरु आहे, लोक गावी गेले आहेत. त्यांना मतदानासाठी बोलवा, बुथवर आपल्याला जास्त काम करायचे आहे. प्रत्येक मतदाराला मतदानासाठी बाहेर काढायचे आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदींना मत, त्यामुळे सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करा, पुढची पाच वर्ष खासदार तुमची सेवा करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
——————–