इस्लामाबाद – भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर पाकिस्तान चांगलाच अस्वस्थ झालेला दिसत आहे. यामुळेच आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही शेजारी देश पाकिस्तान आपली चांद्रमोहीम राबवणार आहे. पाकिस्तानच्या या चांद्रयान मोहिमेचे नाव आयक्यूब-क्यू असे असून हा उपग्रह उद्या रोजी चीनच्या चांगई ६ यानबरोबरीने हेनान येथून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. मात्र, पाकिस्तानचा हा उपग्रह चंद्रावर उतरणार नसून चंद्राच्या कक्षेत फिरणार आहे.
पाकिस्तानच्या चांद्रयान मोहिमेतील हा उपग्रह चंद्राशी संबंधित माहिती पाठवेल. इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीने सांगितले की त्यांनी चीनच्या शांघाय विद्यापीठ आणि पाकिस्तानची राष्ट्रीय अंतराळ संस्था सुपार्को यांच्या सहकार्याने पाकिस्तानी उपग्रह आयक्यूब-क्यूची रचना आणि विकसित केला आहे. हे ऑर्बिटर दोन ऑप्टिकल कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे, जे चंद्राच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा क्लिक करतील.
अनेक चाचण्यांनंतर पाकिस्तानने आपले ऑर्बिटर आयक्यूब-क्यू चांगई-६ मिशनशी जोडले असल्याचे सांगितले जात आहे.चांगई ६ ही चीनच्या चंद्र मोहिमेतील सहावी मालिका आहे. भारताने प्रथम चांद्रयान, नंतर चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ प्रक्षेपित केले. चीन सहाव्यांदा चंद्राशी संबंधित मोहीम सुरू करत आहे.चीनची चंद्र मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि तिथून नमुने गोळा करून पुढील संशोधनासाठी पृथ्वीवर आणेल. हे मिशन पाकिस्तानसाठी खास मानले जाते.