मुंबई : राज्यातील काही जागांवर महायुतीचा तिढा अद्यापही कायम होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आज तीन जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये, ठाणे व कल्याण लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर, राष्ट्रवादी व शिवसेनेत रस्सीखेच असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातही उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीच्या 47 जागांचं वाटप पूर्ण झालं असून केवळ पालघर लोकसभा मतदारसंघात अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. मात्र, महायुतीकडून कल्याण व ठाणे लोकसभेसाठी घोषणा झालेल्या उमेदवारांनी शिवतिर्थवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरे यांनी यापूर्वीच महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे, ठाणे व कल्याणमध्ये वजनदार असलेल्या मनसेचे आभार मानण्यासाठी शिवसेना व भाजपा उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून आपली भूमिका जाहीर करताना, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं म्हटलं. त्यानंतर, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कामही सुरू केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा झाली. कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, ठाण्यातून नरेश म्हस्केंना शिवसेनेनं मैदानात उतरवलं आहे. ठाण्यात नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे यांच्यात जोरदार फाईट होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव यांनी भूमिका जाहीर करत, नरेश म्हस्के विजयी होतील, असे म्हटले आहे. त्यानंतर, आता नरेश म्हस्केंनी श्रीकांत शिंदे व मिहीर कोटेचा यांच्यासोबत जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.